Abstract:
माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या या आधुनिक काळात माहितीचे आणि मानवी भावभावनांचे आदानप्रदान आमूलाग्र पद्धतीने बदलले आहे. डिजिटल क्रांतीमुळे या भाषिक, भावनिक देवाणघेवाणीला नवनवीन रूपे प्राप्त होत आहेत. भावचिन्हे अर्थात 'इमोजी'चा वाढता वापर याचे एक प्रमुख उदाहरण आहे. प्रारंभीच्या समाजमाध्यम मंचांवर केवळ अक्षरे वा चिन्हांच्या साहाय्याने व्यक्त होणारी ही भावचिन्हे आज चित्रस्वरूपात व्यक्त होताना दिसतात. आजच्या जागतिक भाषिक देवाणघेवाणीत भाषांच्या सीमारेषा ओलांडून या भावचिन्हांचा वापर ऑनलाईन पद्धतीने प्रचंड प्रमाणात होताना दिसतो. मानवी भावधावनांचे प्रकटीकरण सुलभ करण्यासोबतच, आजच्या गुंतागुंतीच्या आणि व्यामिश्र आंतरराष्ट्रीय परिदृश्यात, या भावचिन्हांनी मानवी जीवनाला प्रभावित करण्यातही उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.