Abstract:
कविता, कथा, कादंबरी, नाटक, या वाङमयप्रकारांना लाभलेली प्रतिष्ठा क्वचितच इतर वाङमयप्रकार आणि त्यांच्या उपप्रकारांना लाभली. निबंध, चरित्र – आत्मचरित्र, प्रवासवर्णन, व्यक्तीचित्रण या प्रकारांना मिळालेली प्रसिद्धी ही त्या मागोमागची. उपप्रकारांचा विचार करता कवितेच्या उपप्रकारांना बरीच प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. लघूकथा, लघूकादंबरी हल्लीच्या काळातील ‘अलक’ जोगे प्रकार हे पथनाट्याच्या मानाने बरेच प्रसिद्ध आणि लोकमान्यता प्राप्त म्हणावे लागतील. वस्तूत: संस्कारक्षम, प्रेरणादायी आणि मनोरंजनात्मकता हे पैलू स्वत: सामावून घेतलेले वाङ्मयप्रकार आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगानी प्रतिष्ठा आणि सर्वमान्यत्त्वास प्राप्त ठरले. पण वाङ्मयातील असेही काही उपप्रकार आहेत जे मुळात दर्जेदार असुनही प्रतिष्ठा व सर्वमान्यतेच्या दायऱ्यापासून अत्यंत दुरवर आहेत. जनजागृतीचे अत्यंत प्रभावी माध्यम असलेला नाट्यप्रकार म्हणजे पथनाट्य. सदर शोधनिबंधाद्वारे पथनाट्य या प्रकाराला आवश्यक असलेल्या प्रतिष्ठा, सर्वमान्यता आणि एकंदरीत या प्रकाराच्या दर्जाविषयीची चिकित्सा अपेक्षित आहे. भारत हा कलासंपन्न देश होय. भरतमुनी अगोदरची नाट्य परंपरा या देशात सांगितली जाते. नाट्य, संगीत, शिल्प अशा कलांची ऐतिहासिकता तर निर्वादीत स्वरूपाचीच आहे. त्यातच लोकनाट्यातून विकसित होऊन ‘नाटक’ या संज्ञेत बसू पाहणारे अनेक आविष्कारही (‘नाट्ट्यचा’ एक प्रकार या अर्थाने) आज ‘नाटक’ या संकल्पनेत स्वत:चे स्थान शोधू पाहत आहेत. त्यातलाच एक प्रकार म्हणजे पथनाट्य. पथनाट्याची सुरूवात नेमकेपणी कुठून झाली हे सांगता येणे बरेच कठीण आहे. काही संदर्भसाधने पडताळत असताना काही खुणां सापडल्या परंतू खुणांना काही पुरावा अथवा तथ्य मानता येत नाही. वर्तमानात पथनाट्य हा नाट्य प्रकार म्हणून तसा बराच माहितीतला आहे. परंतू वाङ्मयव्यवस्थेत प्रतिष्ठेचे स्थान अथवा सर्वमान्यता यांच्या शोधात हा प्रकार आहे; असे म्हणणे काही गैर ठरणार नाही.