Abstract:
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गोमंतभूमीला परंपरेने सांस्कृतिक वैभवाचा समृद्ध वारसा लाभला आहे. हा वारसा कालानुक्रमे वृद्धिंगत होत राहीला. येथील भूमी, निसर्ग, नदी, समुद्र यांना प्राधान्य देणारी गोमंतकीय संस्कृती या प्रदेशातील जनतेच्या जीवनप्रणालीत नैसर्गिकरित्या एकरूप झाली होती. गोव्यात सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी सत्ता प्राप्त करताच येथील जनतेचे ख्रिस्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्याला गोमंतकीय वीरांनी प्रखर विरोध केला. काहींचे बळजबरीने ख्रिस्तीकरणकरण्यात आले असले,तरी त्यांनी आपली संस्कृती सोडली नव्हती. अशा नवख्रिस्ती लोकांनी पोर्तुगीजांची युरोपीय संस्कृती स्वीकारावी आणि पूर्वीच्या हिंदू संस्कृतिप्रमाणे वागू नये, यासाठी पोर्तुगीजांनी अनेकविध प्रयत्न केले. शेवटी पोर्तुगीजांनीगोव्यात ‘Inquisition’ न्यायालयस्थापन केले. त्यात अपराध सिद्ध झाला, तर त्या अपराध्याला भयानक शिक्षा केल्या जात होत्या. तरीही गोमंतकीय नवख्रिस्ती जनता आपल्या पूर्वाश्रमीच्या संस्कृतीपासून प्ररावृत्त झाली नाही. त्याच्या मतपरिवर्तनासाठी युरोपातून गोव्यात आलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सतराव्या शतकात मराठी ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या या ग्रंथांवर गोमंतकीय संस्कृतीचा, ग्रंथपरंपरेचा प्रभाव दिसून येतो. प्रस्तुत शोधनिबंधात फादर स्टीफन्स, फादर एतियनदला क्रूवा आणि फादर आंतोनियुदसालदांज या तीन युरोपीय ग्रंथकरांच्या रचनांचा प्रातिनिधिक परामर्श घेतला आहे.